आगामी नवी मुंबई निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऐरोली व बेलापूर मधील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सोमवारी खासदार नरेश म्हस्के यांनी महत्वाच्या मार्गदर्शक सूचना केल्या. याप्रसंगी त्यांच्यासोबत निवडणूक प्रचार सचिव अनिल भोर ,जिल्हाप्रमुख किशोर पाटकर,द्वारकानाथ भोईर आणि महिला आणि युवा सेना पदाधिकारी उपस्थित होते.
नवी मुंबईत प्रथमच मनपाची निवडणूक बहुसदस्य प्रभाग पद्धतीने होणार आहे. यात काही जुन्या जाणत्या अनुभवी ज्येष्ठ माजी नगरसेवक असलेल्या उमेदवारांसह काही नवखे उमेदवार देखील असणार आहेत. नवख्या उमेदवारांसह ज्येष्ठ माजी नगरसेवक असलेल्या उमेदवारांनी देखील मनपा निवडणुकीला सामोरे जाताना काळजीपूर्वक जावे, अती किंवा फाजील आत्मविश्वास त्यांनी बाळगू नये, आपसात फूट पडू देऊ नका असा सल्ला देताना त्यांनी प्रारूप मतदारयादी चाळून त्याबाबत काही शंका आक्षेप असल्यास त्वरित हरकती नोंदवा कारण त्यासाठी आता फक्त दोनच दिवस उरलेले आहेत याची जाणीव त्यांनी शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना करून दिली.बहुसदस्य प्रभाग पद्धतीच्या निवडणुकीत भले भले उमेदवार गारद होतात तेव्हा तुम्ही सर्व परीने सावध राहून निवडणुकीला सामोरे जा. मनपावर आपल्याला महायुतीचा भगवा फडकवायचा आहे,आणि वरिष्ठांचा आदेशानुसार युतीचा निर्णय झाल्यास युती धर्माचे पालन करायचे आहे असेही यावेळी खासदार म्हस्के यांनी नमूद केले.
वाशी सेक्टर १० ए येथील बालाजी मंदीर सभागृहात संपन्न झालेल्या या मार्गदर्शन बैठकीला शिवसेना निवडणूक प्रचार सचिव अनिल भोर, जिल्हा संपर्क प्रमुख अंकुश कदम, जिल्हाप्रमुख किशोर पाटकर,जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर, महिला जिल्हाप्रमुख सरोज ताई पाटील, शीतल ताई कचरे, युवासेना प्रमुख अनिकेत म्हात्रे ,माजी ज्येष्ठ नगरसेवक,शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.