नवी मुंबईत अवैधरित्या ७५ हून अधिक बाइक टॅक्सी चालवणाऱ्यांवर कारवाई
वाशी ()- राज्यात बाइक टॅक्सीला बंदी असतानाही ॲपद्वारे प्रवासी बुकिंग घेऊन त्यांची वाहतूक करणाऱ्या ७५ हून अधिक बाइक टॅक्सी चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दत्तात्रेय सांगोलकर यांनी दिली. यामध्ये रॅपिडो कंपनीच्या एप्लीकेशनद्वारे प्रवासी वाहतूक करणाऱ्या ७०, तर उबेर कंपनीच्या एप्लीकेशनद्वारे प्रवासी वाहतूक करणाऱ्या ५ दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आले आहे.
एकट्या प्रवाशाला दुचाकीवरून निश्चित ठिकाणी पोहोचवण्यासाठी काही कंपन्यांकडून मोबाइल अॅप्लिकेशन चालवले जाते; मात्र या कंपन्यांना राज्यात बाइक टॅक्सी चालवण्यासाठी अद्यापपर्यंत शासनाकडून परवानगी मिळालेले नाही. तरी देखील अशा प्रकारच्या बाईक टॅक्सी शहरात प्रवासी वाहतूक करत असल्याच्या तक्रारी परिवहन विभागाला प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार गेल्या काही महिन्यांपासून याप्रकरणी कारवाई केली जात आहे. जानेवारी २०२५ ते नोव्हेंबरपर्यंत ७५ हून अधिक बाईक टॅक्सी चालवणाऱ्यांवर अवैध प्रवासी वाहतूक केल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये १७ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. अवैध प्रवासी वाहतूक केल्या प्रकरणी १ लाख ७६ हजार ५०० रुपये दंड आकारण्यात आला आहे. तसेच संबंधितांकडून अद्याप पर्यंत ५१ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. दंड आकारण्यात आलेल्या दुचाकी या काळया यादीमध्ये टाकल्या जातात. जोपर्यंत संबंधित चालक दंड भरत नाही, तोपर्यंत त्या काळा यादीतून काढल्या जात नाहीत.
दरम्यान, वारंवार कारवाई करूनही शहरात काही प्रमाणात बाईक टॅक्सी चालू असल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्याची पडताळणी करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या पथकाने मंगळवारी प्रत्यक्ष रॅपिडोचा वापर केला. त्यामध्ये तीन वेळा केलेल्या बुकिंग स्वीकारून प्रवासी भाडे घेण्यासाठी तीन दुचाकी हजर झाल्या होत्या. या तीनही दुचाकी आरटीओच्या पथकाने ताब्यात घेऊन रॅपिडो कंपनीविरोधात एपीएमसी पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यावरून मंगळवारी रॅपिडो कंपनीवर गुन्हा दाखल करून ३ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत, अशी माहिती दत्तात्रेय सांगोलकर यांनी दिली.