जुईनगर येथील श्री स्वामी समर्थ मठात मार्गशीर्ष पहिल्या गुरुवारा निमित्त आमदार मंदाताई म्हात्रे यांनी घेतले स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन.....



जुईनगर येथील श्री स्वामी समर्थ मठात मार्गशीर्ष पहिल्या गुरुवारा निमित्त आमदार मंदाताई म्हात्रे यांनी घेतले स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन.....

नवी मुंबई :- मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी श्रीमहालक्ष्मी व्रत केले जाते, ज्यामुळे घरात सुख-समृद्धी, शांती आणि धन-धान्य नांदते, अशी श्रद्धा आहे. त्याच अनुषंगाने आज जुईनगर येथील स्वामी समर्थ मठात मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवाराचे औचित्य साधत आमदार मंदाताई म्हात्रे यांनी स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतले. त्याच बरोबर आज भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. सकाळपासूनच “ॐ श्री स्वामी समर्थ”च्या जयघोषात भक्तांनी श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतले. मठ परिसर आकर्षक फुलांनी सजविण्यात आला होता. मठातील विशेष आरती, अभिषेक, नामस्मरण करण्यात आले होते. तसेच परिसरात भक्तिमय वातावरण पसरले होते. सर्व महिला व भाविकांनी उत्साहाने सहभागी होत महाराजांची कृपा लाभावी, कुटुंबास सुख-शांती लाभो, तसेच सर्व मनोकामना पूर्ण होवोत अशी प्रार्थना केली. 

तसेच मार्गशीर्ष हा हिंदू महिन्यांतला नववा महिना आहे. “मासानाम् मार्गशीर्षोऽहम्” असे भगवद्गीता या ग्रंथात नमूद केले असून या महिण्याला विशेष पवित्र मानले जाते. तसेच महिन्याला भक्ती, संयम, दान-पुण्य, देवपूजा आणि अध्यात्मिक साधनेची विशेष संधी मानली जात आहे. विशेष म्हणजे मार्गशीर्षमध्ये गुरुवार हे दिवस खूप शुभ मानले असून प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मी यांची पूजा व्रत करणे हे महाराष्ट्रात प्रचलित परंपरा आहे. पूजा विधीमध्ये घर स्वच्छ करणे, दीपप्रज्वलन, कलश स्थापणे, लक्ष्मीपूजा, नैवेद्य, फुले, तुलसी किंवा इतर देवपूजन, मंत्रजप, आरती व्रताचा समावेश असतो. मार्गशीर्ष हा महिना श्रद्धा, भक्ती, पुण्यकर्म, आध्यात्मिकता यांचा समर्पित काळ मानला जातो. या निमित्ताने मठात येणाऱ्या भाविकांची संख्या नेहमीप्रमाणे लक्षणीय वाढली होती. मठ व्यवस्थापनाने दर्शन रांगेची विशेष सोय करून गर्दीचे उत्तम नियोजन केले. मार्गशीर्ष महिन्यातील हा पहिला गुरुवार असल्याने भक्तांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला.

यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या समवेत श्री स्वामी समर्थ मठाचे अध्यक्ष संतोष सुतार, सचिव प्रदीप पाटील, समाजसेविका सुहासिनी नायडू व असंख्य श्री स्वामी समर्थ भक्त उपस्थित होते.