एपीएमसी वाहतूक शाखेकडून वाहतूक कोंडी करणाऱ्या १५० वाहनांवर कारवाई
वाशी - एपीएमसी वाहतूक शाखेकडून वाहतूक कोंडी करणाऱ्या १५० वाहनांवर विशेष मोहिमेअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती एपीएमसी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी भांडवलकर यांनी दिली. या वेळी प्रलंबित दंड असलेल्या वाहन चालकाकडून २५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
एपीएमसी वाहतूक शाखेच्या परिसरामध्ये मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे पाच मार्केट येतात. त्यामुळे मार्केट परिसरात बाहेर रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहनांची येजा असते. मसाला मार्केट ते माथाडी भवन पर्यंत तसेच माथाडी भवन ते अगदी फळ मार्केटपर्यंत रिक्षा चालक तसेच अन्य वाहने अयोग्य प्रकारे रस्त्यांवर वाहने लावत असल्याने वाहतूक कोंडी होत होती. दोन मिनिटांचा रस्ता पार करायला अनेकदा पाच ते सात मिनिटे लागत होते. मार्केटमध्ये जाणारी वाहने तसेच मार्केटमधून बाहेर पडणारे वाहने यांना या वाहतूक कोंडीच्या सामना करावा लागत होता.
याप्रकरणी घाऊक भाजीपाला व्यापारी महासंघाच्या वतीने भाजीपाला मार्केट समोर सकाळी रिक्षा वाल्यामुळे वाहतूककोंडी होत होती, अशी तक्रार करण्यात आली होती. याची नोंद घेत सदर ठिकाणी नियमित कारवाई केल्याने वाहतूककोंडी कमी झाली. नियमित कारवाई केल्यामुळे व्यापारी वर्गाचे समाधान झाल्याने त्यांनी संघटनेच्या वतीने पोलीस निरीक्षक शिवाजी भांडवलकर यांचा सन्मान केला. या वेळी जमलेल्या लोकांना वाहतूक नियमांबद्दल प्रबोधन करण्यात आले.

