रक्तदान शिबिराद्वारे २६/११ मुंबई दहशतवादी आक्रमणातील हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली

रक्तदान शिबिराद्वारे २६/११ मुंबई दहशतवादी आक्रमणातील हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली




नवी मुंबई - नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि वाहन चालक–मालक परिवहन प्रतिनिधी सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने २६/११ आतंकवादी आक्रमणात हुतात्मा झालेल्या जवानांना रक्तदान शिबिराद्वारे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. गेली १० वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम सातत्याने राबवला जात असून यंदाही याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


या शिबिरामध्ये मीनाताई ठाकरे रक्तपेढीच्या माध्यमातून रक्तसंकलन करण्यात आले. शेकडो जबाबदार आणि जागरूक नागरिकांनी रक्तदान करून समाजाप्रती आपली नैतिक जबाबदारी पार पाडली. कार्यक्रमास उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दत्तात्रय सांगोलकर, सहाय्यक परिवहन अधिकारी  गजानन गावंडे, दरगोडे, मोटार वाहन निरीक्षक शिरसागर,  म्हेत्रे, देवरे तसेच परिवहन विभागातील अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


या वेळी दत्तात्रय सांगोलकर म्हणाले की, शहीद जवानांनी राष्ट्रासाठी प्राणाचे बलिदान दिले. रक्तदान करून आपणही समाजात आदर्श निर्माण करण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. गजानन गावंडे यांनी 

रक्तदानाचे महत्त्व वाढवण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय सदैव अग्रस्थानी राहील, असे नमूद केले.

तसेच वाहन चालक–मालक परिवहन प्रतिनिधी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजेश भोईर, सचिव  धनंजय पाटील, अमरदीप गिलसिंग इतर पदाधिकारींनी रक्तदान करून शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. समाजसेवक निलेश कचरे यांनी “रक्तदान ही भारतीय नागरिकांची सर्वोच्च सामाजिक सेवा आहे. एकाची कृती हजारो लोकांसाठी प्रेरणा ठरू शकते. प्रत्येकाने मन परिवर्तन करून रक्तदान संस्कृती वाढवण्यास हातभार लावा, असे आवाहन केले.