रिपब्लिकन सेना प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी शिवसेना (एकनाथ शिंदे) गटाशी अधिकृत युतीची घोषणा


 नवी मुंबई │ बेलापूर –

रिपब्लिकन सेना प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी शिवसेना (एकनाथ शिंदे) गटाशी अधिकृत युतीची घोषणा


केल्यानंतर, नवी मुंबईतही या राजकीय हालचालींना गती मिळाली आहे. याच पार्श्वभूमीवर रिपब्लिकन सेना महिला आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सोमवारी बेलापूर विधानसभा क्षेत्राचे जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांची सदिच्छा भेट घेतली.

या भेटीत नवी मुंबई महिला जिल्हाध्यक्ष रेखाताई इंगले, जिल्हा सचिव भारतीताई कांबळे, बेलापूर तालुका अध्यक्ष सुशीलाताई ढवळे, ऐरोली तालुका अध्यक्ष उलपतताई पठाण, घणसोली विभाग अध्यक्ष वर्षा बनसोडे तसेच इतर महिला पदाधिकारी सहभागी झाल्या होत्या.

बैठकीत नवी मुंबई मनपा निवडणुकीतील राजकीय समीकरणांवर चर्चा झाली. रिपब्लिकन सेना प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी दिलेल्या स्पष्ट निर्देशांनुसार नवी मुंबईतही रिपब्लिकन सेना शिवसेना (शिंदे गट) ला अधिकृत पाठिंबा देणार असल्याचे महिला पदाधिकाऱ्यांनी पाटकर यांना कळविले.

किशोर पाटकर यांनी या समर्थनाचे स्वागत करताना, नवी मुंबईतील निवडणूक लढतीत शिवसेना-रिपब्लिकन सेना आघाडी भक्कमपणे उतरेल असा विश्वास व्यक्त केला. मनपा निवडणुकीत दलित समाज आणि इतर वंचित घटकांची राजकीय एकजूट महत्त्वाची ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

रिपब्लिकन सेनेच्या महिला नेतृत्वाचा हा पाठिंबा मिळाल्याने शिवसेना (शिंदे गट) च्या नवी मुंबईतील संघटन कार्याला बळ मिळणार असून, मतदारसंघातील राजकीय वातावरणात नवीन समीकरणे तयार होत आहेत. आगामी मनपा निवडणुकीत या नव्या आघाडीचे कितपत परिणाम उमटतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.